
नाचू लागलं चहुंकडं हुत-हुत-हुत
मानगुटावर बसलंय महागाईचं भूत
गड-गड-गडून गेलं गृहिनींचं बजेट
पर्सवर आलंय त्यांच्या भलतंच नेट
फुकटात शिकवू म्हणे सरकारी राव
मुलांच्याही ट्युशनचे वाढलेत भाव
जाऊन त्यांना सांगाया, नेमू या का दूत……
मानगुटावर बसलंय महागाईचं भूत
आजीच्या पिशवीवर आलाय ताण
नातवांना देता देता खाऊसाठी दान
आजोबांचा खिसाही झालाय खाली
म्हाताऱ्यांच्या चमूत ह्याच बोलाचाली
गप्पाना चढे त्यांच्या भलताच ऊत………
मानगुटावर बसलंय महागाईचं भूत
बँकांचे हप्ते भरून बाबा झाले बेजार
चिंतेचा त्यांना म्हणे जडलाय आजार
पाचाचे टक्के होती सहा-सात-आठ
मुद्दल अन व्याजाची सुटेना ती गाठ
उडतोय गोंधळ अन चाले रुतारुत……….
मानगुटावर बसलंय महागाईचं भूत
भाजीपाला फळं फुलं चढतेच भाव
कपाटाच्या तिजोरीनं गाठलाय ठाव
पेट्रोल डिझेलाचे काय वानावे मोल
फास्टटॅगनं भरायाचा आहे पुन्हा टोल
अकाउंट अन बॅलन्सचं जुळेना की सूत……
मानगुटावर बसलंय महागाईचं भूत
सगळ्यांना पडलाय जगण्याचा घोर
महागाईच्या विळख्यानं धरलाय जोर
दिल्लीच्या तख्ताला भिडू या की थेट
वजीराला देऊन पाहू थोडे चेकमेट
सोडू या की सारेजनं मोठी गुतागूत…….
मानगुटावर बसलंय महागाईचं भूत